औरंगाबाद: पावसाळ्याच्या तोंडावर वाढत चाललेल्या साथ रोगांची संख्या लक्षात घेता महापौर नंदकुमार घोडेले यांच्यावतीने (सोमवार दि.८) घनकचरा व आरोग्य विभाग यांच्यासह विविध विभागाच्या बैठका बोलावण्यात आल्या आहेत.
पावसाळ्याला सुरुवात झालेली असून, नाले सफाईची कामे उरकून घेणे अपेक्षित असताना आता पावसाळा सुरू झाल्यानंतर देखील नालेसफाईची कामे पूर्ण झालेली नाहीत. अनेक ठिकाणे सफाईचा नावाखाली नाल्यातला कचरा बाजूला सारून पाणी जाण्यासाठी जागा करून देण्यात आल्याचे चित्र पाहायला मिळते. दुसरीकडे अनेक ठिकाणी रस्त्यावरच कचरा पडलेला असल्याने त्यावर होणाऱ्या डास, माशांमुळे शहरात सध्या साथीच्या रोगांचे रुग्ण आढळत आहे. यात डेंग्यू ,डायरिया ,सर्दी खोकला, आदी आजाराने ग्रस्त रुग्णांचा समावेश आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज सोमवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी विभागांच्या बैठका बोलावले असून, यात घनकचरा, आरोग्य विभाग, नालेसफाई, स्मार्ट सिटी व पाणीपुरवठा आदी विभागांचा समावेश आहे. त्यानुसार दुपारी बारा वाजता महापौर दालनात या बैठकीला प्रारंभ झाला. घनकचरा व आरोग्य विभागाचा बैठकित रस्त्यावर पडलेला कचरा, मृत प्राण्यांचे शव, शहरात वाढतासलेले साथरोगांचे रुग्ण याबाबत उपाययोजना संबंधी चर्चा करण्यात येणार असल्याचे समजते. यासह शहरातील नालेसफाईच्या परिस्थितीचा आढावा देखील घेण्यात येणार असल्याचे समजते. यावेळी संबंधित विभागाचे प्रमुखांची उपस्थिती होती.